विवाहितेच्या छळप्रकरणी आठ आरोपींची निर्दोष मुक्तता

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : हुंड्यासाठी छळ, मारहाण करून उपाशी ठेवणे तसेच घराबाहेर काढल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील ढालसावंगी येथील सासरच्या आठ जणांची सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. टी. अढायके यांनी सबळ पुराव्याअभावी गुरुवारी निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणातील पती शेख अय्युब, शेख मुश्ताक (सासरा), शेख शाहीन (सासू), शेख हिनाबी (मोठी नणंद), शेख मुख्तार (दिर), शेख सलीम इसा (मामे सासरा), शेख गौसिया (मामे सासू) आणि शेख फातिमाबी (नणंद) (रा. ढालसावंगी, जि. बुलढाणा) यांची न्यायालयाने निर्दो ष मुक्तता केली. फिर्यादी फिरदौसबी शेख अय्युब (माहेर रा. अजिंठा) यांनी ३० मार्च २०२३ रोजी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्यांचा विवाह २४ मार्च २०१९ रोजी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सासरी चांगली वागणूक मिळाली. मात्र, दोन अपत्ये झाल्यानंतर सेंट्रिंगचे साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. 

मागणी पूर्ण न केल्याने उपाशी ठेवणे, मारहाण करणे व घरातून हाकलून देणे असा छळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील सय्यद रिजवान यांनी आरोपींच्यावतीने युक्तिवाद करताना, आरोपी कुटुंब शेती व्यवसायाशी संबंधित असून फिर्यादीही शेतातील कामांमध्ये सहभागी होत होती, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपींकडे बागायती शेती असून फिर्यादीचा पती मजुरीचे काम करतो, तो मिस्त्री किंवा ठेकेदार नसल्याचेही नमूद करण्यात आले.

याशिवाय, तपासादरम्यान पोलिसांनी कथित घटनास्थळाचा पंचनामा केला नसल्याचे तसेच एकही स्वतंत्र साक्षीदार तपासण्यात आलेला नसल्याचे बचाव पक्षाने मांडले. सरकार पक्षाला आरोप संशयापलीकडे सिद्ध करता आले नसल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अॅड. सय्यद रिजवान यांना अॅड. दादाराव आळणे यांनी सहकार्य केले.